मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला पालकमंत्र्याच्या हस्ते विरोध सकल मराठा समाज धाराशिव

Spread the love

मराठावाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला पालकमंत्र्याच्या हस्ते विरोध सकल मराठा समाज धाराशिव.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याचा निषेध; स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहणाची मागणी

धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला विरोध करण्याचा इशारा अखंड मराठा समाज, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे. पालकमंत्र्यांऐवजी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यासंदर्भात अखंड मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे जात असताना त्यांच्या आंदोलनाला शासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

लोकशाही व्यवस्थेत न्याय्य मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजात तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे लोकशाही आणि स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जात असताना, दुसरीकडे समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करू इच्छिणाऱ्या नेतृत्वाला आंदोलनाची परवानगी नाकारली जाणे ही गंभीर बाब असल्याचे अखंड मराठा समाजाने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास विरोध नोंदविण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याऐवजी मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यामुळे मराठवाडा मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा योग्य सन्मान होईल तसेच लोकशाही मूल्यांप्रती प्रशासनाची बांधिलकी अधोरेखित होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शांततामय आणि संविधानिक आंदोलनाचा मार्ग खुला ठेवावा, अशी मागणीही अखंड मराठा समाजाने केली आहे.

मुख्य संपादक =विलास गपाट

🌻प्रगत किसान प्रगत राष्ट्र🌻

निर्भीड सकारात्मक निपक्ष बातम्यासाठी

वाचा प्रगत किसान न्यूज पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!