वाशी पोलिसांची धडक कारवाई : पृथ्वीराज हॉटेल-लॉजवर छापा, दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका*हॅाटेल मालकासह ग्राहक जेरबंद #
पोलीस स्टेशन वाशी हद्दीतील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. दिनांक 19/01/2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजता करण्यात आलेल्या छापा कारवाईत दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक व संबंधित ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार श्रीमती ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून कारवाई केली. छाप्यादरम्यान देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ पीडित मुलींना मुक्त करण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे साहेब हे गेल्या महिन्यात रुजू झाल्यापासून तालुक्यात होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या यांना धडक कारवाई केल्यामुळे काही प्रमाणात आळा बसला आहे तसेच आताही पारगाव येथील अवैध वेश्याव्यवसायाच्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. तसेच याप्रमाणे अवैध मध्यविक्री, गुटखा विक्री, याच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे.